अकोले खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी; २०० ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

अकोले खुर्द : श्री गणेश समाजसेवा मंडळ, अकोले खुर्द यांच्या पुढाकाराने मार्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, टेंभुर्णी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अकोले खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये एकूण २०० ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५० रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांची रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली.

तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सहकार्य करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आयोजक तसेच उपस्थित ग्रामस्थ यांचे श्री गणेश समाजसेवा मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा लाभ झाला.
“सुदृढ आरोग्य… आनंदी जीवन!” या संदेशातून आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला.
– विशाल पाटील (पत्रकार)






