
माढा (प्रतिनिधी / विशाल पाटील): सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या स्वप्नांना साकार करण्याच्या ध्यासातून अकोले खुर्द गावचे सुपुत्र गणेश अनिल पाटील यांची राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 2 पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश पाटील यांनी या यशासाठी गेली अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, 2024 पासून केवळ 1 ते 2 गुणांनी प्रतीक्षा यादीत (Waiting List) राहिल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्द कायम ठेवत आपल्या ध्येयासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तब्बल तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना यश मिळाले आहे.
या प्रवासात त्यांनी सातारा येथील ‘राजे करिअर अकॅडमी’ मध्ये प्रशिक्षण घेतले. अकॅडमीचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच, या यशामागे पोलिस उप अधीक्षक धनंजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि योग्य दिशादर्शनामुळे गणेश पाटील यांना ध्येय गाठण्यास मोठी मदत झाली.
गणेश पाटील यांच्या या यशामुळे अकोले खुर्द गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
— विशाल पाटील, पत्रकार
