टेंभुर्णी | प्रतिनिधी – टेंभुर्णी शहरातील करमाळा रोड परिसरात सोमवारी (दि. १९ मे) सायंकाळी भीषण आग लागून हार्डवेअर, इलेक्ट्रिकल आणि फर्निचरच्या दुकानांसह गोदामे जळून खाक झाली. या आगीत अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा रोडवरील महेश हार्डवेअर, तोडकर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, तसेच विश्वकर्मा फर्निचर या दुकानांना अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच तिने रौद्ररूप धारण केले. दुकानांतील फर्निचर, इलेक्ट्रिकल साहित्य आणि इतर ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने वेगाने फैलाव घेतला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणाबाहेर गेल्याने विविध ठिकाणांहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नऊ अग्निशमन बंबांच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, टेंभुर्णीसारखे मोठे शहर तसेच औद्योगिक वसाहत (MIDC) असतानाही येथे सक्षम अग्निशामक यंत्रणा नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेवर स्थानिक पातळीवर अग्निशमन सुविधा उपलब्ध असत्या, तर नुकसानाचे प्रमाण कमी झाले असते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-विशाल पाटील (पत्रकार)

