July 14, 2026
ae579be8-4321-491f-b28f-abf868eaae42

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी येथे रविवारी सकाळी चोरी करून पसार झालेल्या सहा जणांच्या टोळीला २० तास पाठलाग करून अखेर पोलिसांनी सोमवारी पहाटे जेरबंद केले. ग्रामस्थांचे धाडस आणि पोलिसांची तत्परता यामुळे टोळीला पकडण्यात यश आले.

सोनूसिंग कपूरसिंग टाक (३५, रा. हडपसर, पुणे), जिलूसिंग शेरसिंग दुधानी (३८, रा. खोपोली, जि. रायगड), पंकजसिंग धारुसिंग सिकगार (३०, रा. आंबरनाथ, जि. ठाणे), करणसिंग गगनसिंग टाक (२७, रा. परभणी), मंगलसिंग मायासिंग दुधाने (५७) आणि कृष्णासिंग साहेबासिंग टाक (१८, रा, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक मोटार कोळवाडीतील एका हॉटेलसमोर उभी असल्याचे विघ्नेश घोलप यांच्या लक्षात आले. वाहन ओळखीचे वाटल्याने त्यांनी चालकांकडे चौकशी करून चावीची मागणी केली. मात्र, संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे देत वाद घातला. वाद विकोपाला जाताच त्यांनी हत्यारे बाहेर काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने सोनूसिंग कपूरसिंग टाक आणि जिलूसिंग शेरसिंग दुधानी यांना ताब्यात घेतले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास आलमे परिसरातून पंकजसिंग धारुसिंग सिकगार आणि करणसिंग गगनसिंग टाक या दोघांना पकडण्यात आले. सोमवारी पहाटे मंगलसिंग मायासिंग दुधाने (वय ५७) याला आलमे येथे, तर कृष्णासिंग साहेबासिंग टाक (वय १८) याला लेण्याद्री परिसरातून ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले.

मोटार ही अहिल्यानगर येथील राहुरी तालुक्यातील कोल्हार येथून चोरण्यात आली होती. या आरोपींनी राज्यातील विविध भागांत गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. नागरिकांनी काही आरोपींना पकडल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी संबंधित आरोपींना उपचारासाठी ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आणि ओतूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

First published on: 14-07-2026 at 11:30 IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *