July 4, 2026
IMG_1103

नारायणगाव : नारायणगाव एसटी स्टँड परिसरात प्रवाशांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२/२०२६ व ९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी मीरा गणपत शिंदे (वय ४८, रा. बोरी साळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी नारायणगाव बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. तसेच भागवत निवृत्ती घाडगे (वय ७५) यांची दीड तोळे वजनाची सोन्याची चैनही चोरीस गेली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले व अभिमन्यू मोटे यांच्या पथकाने बसस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एक संशयित इसम आढळून आला. गोपनीय माहितीच्या आधारे त्याची ओळख अर्जुन कानिफनाथ भोसले (वय २७, रा. धनगर वस्ती, अहिल्यादेवी नगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) अशी पटली.

सदर आरोपी हा बसस्थानक परिसरात चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकारचे ४० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, ६ जून २०२६ रोजी आरोपी नाशिक फाटा, भोसरी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने सदर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले सुमारे १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शर्मा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

-विशाल पाटील (पत्रकार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *